Home > Achievements > श्री. यज्ञेश सावे यांना महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च ‘कृषी रत्न’ पुरस्कार

श्री. यज्ञेश सावे यांना महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च ‘कृषी रत्न’ पुरस्कार

loading...
श्री. यज्ञेश सावे यांना महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च ‘कृषी रत्न’ पुरस्कार

पालघर जिल्ह्याचे ज्येष्ठ प्रगतशील शेतकरी, कृषिभूषण श्री. यज्ञेश वसंत सावे यांना महाराष्ट्र शासनाचा कृषी क्षेत्रातील सर्वोच्च आणि अत्यंत प्रतिष्ठेचा ‘कृषी रत्न’ पुरस्कार दिनांक १ जुलै २०२६ रोजी प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार राज्याचे महामहिम राज्यपाल श्री. जिष्णु देव वर्मा, मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार आणि कृषिमंत्री श्री. दत्तात्रेय भरणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. ‘कृषी रत्न’ हा पुरस्कार दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्रातून केवळ एका शेतकऱ्याला दिला जातो. कृषी क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान मानल्या जाणाऱ्या या पुरस्काराने श्री. यज्ञेश सावे यांच्या कार्याचा राज्यस्तरावर गौरव झाला असून, हा सन्मान पालघर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी वर्गासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. श्री. सावे यांनी पारंपरिक शेतीपुरते स्वतःला मर्यादित न ठेवता विविध नाविन्यपूर्ण कृषी उपक्रम यशस्वीपणे राबविले आहेत. मासेपालन, फुलशेती, चिकू, आंबा, नारळ, जांभूळ यांसारख्या फळबागा तसेच मिरची, टोमॅटो, दुधी, पडवळ आणि विविध प्रकारच्या भाजीपाल्याचे विक्रमी उत्पादन त्यांनी घेतले आहे. याशिवाय ब्रोकोली, झुकीनी, आईसबर्ग लेट्यूस, पाकचॉय, रेड कोबी, चायनीज कोबी, रंगीत फ्लॉवर, कलिंगड आणि स्ट्रॉबेरी यांसारख्या उच्च मूल्याच्या पिकांचीही त्यांनी यशस्वी लागवड करून आधुनिक शेतीचा आदर्श निर्माण केला आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी त्यांनी चिकू आणि आंब्याचे संकलन केंद्र उभारून परिसरातील शेतकऱ्यांकडून फळांची खरेदी करून देशभरातील बाजारपेठांमध्ये विक्रीची प्रभावी व्यवस्था निर्माण केली आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर जमीन भाडेतत्त्वावर घेऊन ती बागायतीखाली आणणे, दुग्धव्यवसाय, गवत खरेदी-विक्री यांसारखे पूरक व्यवसायही त्यांनी उभे केले आहेत. पंच्याहत्तरी पूर्ण करूनही श्री. सावे यांची कृषीसेवेची तळमळ कायम आहे. शासनाच्या विविध समित्या, कृषी संस्था आणि संघटनांमध्ये कार्यरत राहून त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. कृषी विद्यापीठे, संशोधन संस्था, कृषी आयुक्तालय तसेच मंत्रालयातील अधिकाऱ्यांशी सातत्याने संवाद साधून आधुनिक तंत्रज्ञान आणि संशोधनाचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे. या यशामागे त्यांच्या पत्नी शीतल सावे यांची मोलाची साथ लाभली आहे. प्रत्येक टप्प्यावर त्यांनी श्री. सावे यांना खंबीरपणे साथ देत त्यांच्या कृषी प्रवासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. श्री. यज्ञेश वसंत सावे यांना प्राप्त झालेला ‘कृषी रत्न’ पुरस्कार हा केवळ त्यांच्या वैयक्तिक कार्याचा गौरव नसून पालघर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी समाजासाठी प्रेरणादायी आणि अभिमानाचा क्षण असल्याची भावना सर्व स्तरातून व्यक्त होत आहे

Comments

view all
Category

Sports      Education      Weather      Entertainment      Politics      Business      Economics      Health      Sad Demise      Current Affairs      Festive      Achievements     
Achievements

logo
Download our app by clicking the link below :
logo logo
Useful Links

© 2024 SKS Connect | All Rights Reserved | Powered By OTET Infosystems